जिकडे तिकडे कबीर
शाळेत असताना तिसरी-चौथीच्या हिन्दीच्या पुस्तकात ’कबीरदास की साखी’ नावाचा धडा होता, त्यात पहिल्यांदा भेटले कबीरदास.
दोन-दोन ओळींच्या सरळ,सोप्या कविता. तुलसीदास,रैदास ,रहीमादिंच्या अशा दोन ओळींच्या कवितेला दोहा म्हणायचे, पण कबीरच्या दोन ओळींच्या कवितेला मात्र साखी म्हणायचे, असा सादा सरळ हिशोब मी लक्षात ठेवला होता.
दोहे कुणाचेही असो, त्यांची गंमत अशी होती कि पटकन पाठ व्हायचे, आणि मग लक्षात पण रहायचे। भाषेची सहजता हेच त्या दोह्यांचे सौंदर्य होते.
बोलता-बोलता सहजपणे म्हणींसारखा या दोह्यांचा वापर करता यायचा.
आपले वाक्चातुर्य दाखवायला,किंवा समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी दोहे फार चांगले शस्त्र आहे ह्याची प्रचीती वेळो वेळी यायची.
वर्गात सगळ्यात बुटकी असल्यामुळे, कधी कोणी चिडविले, की कबीरची साखी मदतीला असायचीच. मी अगदी ठासून सांगायचे
बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर।
(पंथी- वाटसरू)
जणूं काही कबीरने ह्याच प्रसंगासाठी या ओळी म्हंटल्या असाव्यात.
तसेच हाथ जोडून चेह-यावर गरीब भाव आणून म्हंटलं
“छिमा बड़न को चाहिये, छोटन को उत्पात” की उत्पात जरी थोडा मोठा असला, तरी शिक्षेचे प्रमाण जरा सौम्य व्हायचे.
(लहान मुलांने खोड्या केल्याच पाहिजेत आणि मोठ्या मनाने त्यांना क्षमा करणे हे मोठ्या माणसांचे कर्तव्यच आहे, असा ह्या ओळींचा मी सोईस्कर अर्थ काढला होता.)
माझ्या वडिलांना सहज बोलता-बोलता खूप म्हणी,दोहे शेर वगरे आठवतात. आपले मत पटवून देण्यासाठी ते अशा खूप गोष्टीचा वापर करतात.
वकील असल्यामुळे बोलणे हा त्यांचा व्यवसायच होता, पण क्लायंटकडे फी मागताना त्यांचे तोंडच उघडायचे नाही. जे जमेल ते दे, एवढेच ते सांगू शकायचे. त्या मुळे कोणी फी द्यायचे कोणी नाहीं. या विषयावर त्यांचे वकील मित्र सल्ला द्यायचे तेव्हां ते म्हणायचे
साईं इतना दीजिये, जा में कुटुंब समाए।
मैं भी भूखा ना रहूँ, साधु ना भूखा जाए।
पैश्याची गुंतवणूक ही त्यांना कधीच न जमणारी, न आवडणारी गोष्ट. हितचिंतक सांगायचे की मुलांसाठी काहीतरी गुंतवणूक करून ठेवा. त्यावर त्यांच आवडत उत्तर होतं
पूत सपूत तो क्या धनसंचय,
पूत कपूत तो क्या धनसंचय.
पुत्र जर वाईट असेल, तर त्याच्यासाठी काहीही ठेवण्यात अर्थ नाही. किती ही धन ठेवले तरी तो ते उडवेल. आणि पुत्र जर सुपुत्र असेल तर त्याच्यासाठी काही ठेवण्याची गरजच नाही। त्याचे तो स्वत:च मिळवेल.
त्यांचाच परिणाम असेल, पण मला ही या न त्या कारणाने खूप दोहे ,साखी आठवतात।
माझी मुलं लहान असताना त्यांना उपदेशांचे डोस देताना, मला पदो पदी कबीरदासांची आठवण व्हायची।
“नींद निशानी मौत की ऊठ कबीरा जाग ।”
“करीन ग, पाच मिनिट….., थांब न जरा” अस काही म्हणायचा उशीर, की माझे पुढचे वाक्य तयारच
“काल करे सो आज कर, आज करे सो अब,
पल में परलय होयगी, बहुरि करेगा कब ।।
मोठा कधी चिडला, की धाकट्याला तुम्ही डोक्या वर चडविले आहे. नेहमी मीच का समजून घ्यायचे?
तेव्हां मी त्याला समजवायची, की बघ कबीरदासांनी पण म्हंटले आहे की
छिमा बड़न को चाहिये, छोटन को उत्पात
कहा बिशनु का घट गये, जो भृगु मारी लात।
लहान व्यक्ति ने किती ही उपद्रव केला तरी त्याला क्षमा करण्यातच मोठ्या (मनाच्या) माणसाचे मोठेपण आहे। भृगुमुनिंनी चिडून विष्णुच्या छातीवर लाथ मारली , पण त्याने काही विष्णुला कमीपणा आला नाहीं .
एकदा मुलांचं जोरदार भांडण चालू होतं . मी मध्यस्थी करायला गेले, तर सागर म्हणाला “ आता हे नको म्हणू की भांडणावर पर कबीर काही तरी बोललेच आहेत”
आणि मिश्किलपणे कबीर म्हणाले
सज्जन से सज्जन मिले होवे दो दो बात।
गदहे से गदहा मिले होवे दो दो लात।।
चौदाव्या शतकात झाले कबीर. काळ बदलला, माणसं बदलली, संदर्भ बदलले, पण आज ही कुठल्याही प्रसंगात इतकी चपखल बसते त्यांची साखी, जणू त्याच प्रसंगासाठी लिहिली असेल.
माझ्या नवीन एटीएम कार्डचे मला पोस्टाने दोन पिन नम्बर मिळाले . बँकेत जाऊन चौकशी केल्यावर तिथल्या अधिका-याने अत्यंत हसत मुखाने सांगितलं “चांगलय ना मॅडम, कधी हा नंबर वापरा कधी तो .” थोडा वेळ त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला स्वत:च्या बुद्धी वरच संशय येऊ लागला आणि कबीर आठवले
ज्ञानी से ज्ञानी मिलैं,रस की लूटम लूट,
ज्ञानी अज्ञानी मिलैं, होवैं माथाकूट ।
पुण्यातल्या एका मोठ्या मॉलमधे गेलो . किरकोळ खरेदी केली. काउंटरवर पैसे द्यायला गेले तेवढ्यातच दिवे गेले .तिथल्या टाय घालून अस्खलित इंग्रजी बोलण्या-या मुलाने कॅलक्युलेटर शोधायला सुरुवात केली .फक्त १६४ रुपयांची खरेदी होती. मी त्याला शंभरच्या दोन नोटा आणि वर चार रुपये सुट्टे काढून दिले आणि सांगितले की मला चाळीस रुपये परत दे. तो काही क्षण आश्चर्याने बघत राहिला आणि मग म्हणाला
“ वेट, आय विल ब्रिंग द कॅल्सी”.
त्याने कुठुन तरी शोधून पाच मिनिटात कॅल्सी आणला. मग त्यावर २०० वजा १६४ केले आणि अत्यंत आनंदा ने म्हणाला
“ सी ,इटस् ओनली थर्टी सिक्स, नॉट फोर्टी”
मग त्याने दहाच्या चार नोटा काढल्या . त्याच्या कॅल्सीवर चाळीस वजा छत्तीस केले आणि मला विचारले “ डू यू हेव फोर रुपीज चेंज मॅम?” त्याच्या या शास्त्रोक्त कार्य पद्धतीचे कौतुक करावे की उगाच १० मिनिटे वाया गेल्या बद्दल दुख करावे हेच मला कळेना .
ज्ञानी अज्ञानी मिलैं, होवैं माथाकूट
आता इथे आम्ही दोघेही स्वत:लाच ज्ञानी समझत होतो ही गोष्ट निराळी।
मैत्रीणीची फार इच्छा होती मुलीने कथ्थक शिकावे . मुलीला गोल गोल गिरट्या मारायला अजिबात आवडायचे नाही. पण आईचा आग्रह “तुला आवडेल हळू हळू . त्याची मजा एकदा कळली की आवडेलच.”
रोज रडा-रड, आरडा ओरड. मग मुलीच पोट दुखू लागल . फक्त क्लासच्याच वेळेत नाही तर कधी ही कुठे ही. डॉक्टर म्हणाले आधी क्लास बंद करा. आणि सहजपणे कबीर म्हणाले
सो कछु आवे सहज में , सोई मीठा जान,
कड़वा लागे नीम सा , जा में एंचातान।
जे सहज येत, त्याचीच खरी गमंत असते . खूप ओढाताण करून काही मिळाल तरी त्याची चव कडुलिंबासारखी असते.
कितीतरी वेळा अपेक्षाभंग होतो,मनासारखे होत नाही. खुप चिडचिड होते, तेव्हां कबीर हे म्हणून सांत्वन करतात…
धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय।
माली सींचे सौ घड़ा , रितु आए फल होय।
रे मना जरा धीर धर . प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ यावी लागते. माळ्याने शंभर घागरी पाणी जरी ओतले तरी झाडाला फऴे निसर्गाच्या नियमाप्रमाणेच योग्य वेळ आल्यावरच लागतात.
कुठला असा विषय आहे रोजच्या जगण्यातला की त्याचाबद्दल कबीरदास काही बोलले नाही.
रोज उठून अगदी अमेरिकी राष्टाध्यक्षांपासून विविध गुरूंच्या भानगडींच्या बातम्या एकल्या की वाटतं तरी कबीर सांगत होते की
परनारी को राचणों, ज्यों लहसुन की खाणि,
कोने बैसे खाइये, परगट होय निवानी ।।
परस्त्रीच्या मोहात पडणे लसूण खाण्यासारखे आहे. अगदी एकांतात कोप-यात लपून खा पण तरी ही त्याचा वास लपत नाही.
रोज सकाळी पेपर उघडला की वेगवेगळ्या कोचिंगक्लासच्या जाहिराती दिसतात. तेव्हां वाटत चौदाव्या शतकातच कबीर म्हणाले होते
गुरुवा तो सरता भया,कौड़ी अर्थ पचास।
अपने तन की सुध नहीं, शिष्य करन की आस।
पैशाच्या लोभी गुरुंची जगात काही कमी नाही, एक शोधायला जा, पैशाला पासरीभर मिळतील. स्वत:च काय चाललय हे कळत नाही, पण शिक्षणाचा धंदा मांडून बसतात.
एकीकडे गुरूचे महात्म्य हरीपेक्षा जास्त सांगणारे कबीरच या लबाड गुरुंपासून सावध पण करतात.
गुरू तो घर घर फिरें,दीक्षा हमारी लेह।
कै डूबो कै ऊबरो, टका परदानी देह।।
गुरूच फेरीवाल्या सारखे दारोदारी फिरत आहेत की आमच्याकडून दीक्षा घ्या. मग तुम्हीं तगा किंवा बुडून मरा आम्हाला काळजी नाही, आमची दक्षिणा तेवढी विसरू नका.
कमाल आहे कबीरची!
वजन कमी करायला जिम चालू केले. अगदी जीव तोडून व्यायाम करून ही वजनाच्या काट्यावर काहीच हालचाल नाही. खूप चिडचिड झाली . आणि अगदी तिथे सुद्धा हसतच कबीर म्हणाले
खट्टा मीठा चर्फरा ,जिव्हां सब रस लेय।
चोरों कुतिया मिल गई, अब को पहरा देय।।
आंबट, गोड,चटपटीत सगळ्या चवींचा मनसोक्त आनंद जीभ घेत आहे, राखण करायला ठेवलेली कुत्रीच जर चोरांची साथीदार झाली तर आता पहरा कोण देणार?
त्यांची विनोद बुद्धीपण जबरदस्त होती। त्यांच्यासारखा व्यंगकार हिंदी साहित्यात दुसरा नाही। हिंदीत म्हणतात न की मखमली जूतियाँ सहला-सहला कर ऐसी मारी, कि खाने वाला उफ् भी ना कर सका,” अस होतं त्यांच बोलणं .
ना जाने साहिब कैसा है?
मुल्ला हो कर बांग जो देवे,
क्या तेरा साहिब बहरा है?
एक मैत्रिणीला सदैव पैसे मागायची सवय होती. परतही करायची ती कधी तरी, पण तिने पैसे मागितले की लोक फार संकटात पडायची. चांगली मैत्रिण होती ,नाही पण म्हणता यायचे नाही। मग आम्ही तिला टाळायचो। लोकं म्हणायची “ती येणार असेल तर आम्ही येणार नाही. तिने मागितलं की नाही म्हणता येत नाही . दिले कि पैसे जातात आणि नाही दिले की आपला आणि तिचा दोघांचा मूड जातो.”
कबीरदासांची आठवण व्हायची. शाळेत या मैत्रिणीने पण वाचलेच होते की
मांगन मरण समान है,तोहि देई मैं सीख।
कहे कबीर समझाय के, मत मांगे कोई भीख।।
आब गया, आदर गया, नैनन गया सनेह।
ये तीनो तब ही गये जब हिं कहा कछु देय।।
कुणाकडेही मागणे हे मरण्यासारखच आहे, अस मी तुला समजाऊन सांगतो. मागणा-याचा मान, सन्मान तर जातोच पण समोरच्या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल असलेल प्रेमही त्याच क्षणी जातं ,ज्या क्षणी तुम्ही त्याच्या समोर हात पसरता.
हे कबीरने तिच्यासाठीच सांगितले असेल तर आमच्या सारख्यांना पण तो त्याच क्षणी झापतो
माँगन गै सो मर रहे, मरैं जु मांगन जाहि।
तिने ते पहिले वे मरैं , होत करत हैं नाहिं।।
मागणे मरण्यासारखे आहे यात काही वाद नाही,पण मागण्या-यांपेक्षा तो आधीच मेलेला आहे जो सक्षम आहे, देऊ शकतो , पण देत नाही.
आणि तेच कबीरदास दुसरीकडे हे ही म्हणतात
मरूँ पर माँगू नहीं, अपने तन के काज।
परमारथ के कारणे, मोहे न आवे लाज।।
जीव गेला तरी स्वत:साठी मी कधी काहीही मागणार नाही, पण परमार्थासाठी कुणासमोरही हात पसरताना मला लाज वाटत नाही.
खरच ! थक्क करणारी आहे कबीरवाणी . कसे सुचत असेल त्याला हे सगळ ? कसा असेल कबीर?
एक दिवस मनात हा विचार आला आणि कबीरवाणी ची ढीगभर पुस्तकं काढून परत नव्याने वाचायला सुरुवात केली।
लहानपणी ’कबीर की साखी’ चा शाब्दिक अर्थ कळला की वाटायचे खूपच सोपे आहे हे, पटकन पाठ होतं, म्हणून आपल्याला आवडतं.
परत वाचायला सुरुवात केली आणि मात्र फारच गोंधळले. जुन्या, अगदी लहानपणापासून माहीत असलेल्या साखींचे नवीनच अर्थ उलगडू लागले . इतक्यांदा बोलताना,लिहीताना सुभाषित म्हणून वापरलेल्या दोह्यांचे अर्थ परत तपासून पहावेसे वाटले.
साखी या शब्दाबद्दल पहिल्यांदा उत्सुक्ता वाटली . ’साखी’ हा शब्द सीख या शब्दाचा अपभ्रंश असेल असा माझा समज होता। पण हिंदी शब्दकोषा प्रमाणे साखीचा अर्थ आहे साक्षी. कविला त्याच्या प्रतिभेमुळे ज्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला ती साखी.
हे ज्ञान त्याने त्याच्या बुद्धीमुळे नाहीतर अंत:करणाच्या साक्षात्काराने मिळविले आहे . साखी ही त्याच्या ज्ञानाचे डोळे पण आहे आणि साक्षी पण . म्हणजे साखी साक्षात्कार करणारी पण आहे आणि करवणारी पण आहे.
थोडक्यात ,संत कविच्या आध्यात्मिक ज्ञानाची साक्षीदार आहे साखी.
साखी शब्दात मला वटायचे तसे सीख किंवा उपदेश पण आहेच.
साखी आँखी ज्ञान की, समुझि लेहु मन माहि।
बिनु साखी संसार का , झगड़ा छूटै नाही।।
साखी हे ज्ञानाचे डोळे आहेत. त्याच्या मदतीने संसाराकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी मिळते.
अंत:करणाच्या साक्षात्काराबद्दल जेव्हां आपण बोलतो, तेव्हां प्रश्न पडतो की हे ज्ञान इतक्या सहजपणे कुणाला ही देता येईल का? माझ्या सारख्या सामान्य माणसाला ते अनाकलनीय असतंच, शिवाय सामान्य माणूस हे ज्ञान सहजपणे, आयतं मिळविण्याचा अधिकारी तरी आहे का?
मग कबीरच्या साखी इतक्या साद्या सोप्या कशा?
खरच कबीरला तेच म्हणायचे आहे का, जे या साखींचा शाब्दिक अर्थ सांगतो? की त्यात काही तरी कोडं आहे ,जे फक्त त्यालाच कळेल जो समजून घ्यायचा प्रयत्न करेल?
साखी सामान्य माणसाला नैतिकतेचा उपदेश आहे, पण फक्त तेवढेच करून ती थांबत नाही। विचार करायला लावते आणि मग एखाद्या ऑप्टिकल इल्युजन सारखे त्यात वेगळेच चित्र दिसू लागते। एखाद्या तिलिस्मासारखी त्याची दारं उघडत जातात.
गंमत म्हणून ज्या साखी कडे मी इतकी वर्ष बघत होते ,ती वेगळीच वाटू लागते।
जेव्हां कबीर म्हणतो की
खट्टा मीठा चर्फरा ,जिव्हां सब रस लेय।
चोरों कुतिया मिल गई, अब को पहरा देय।।
तेव्हां त्याला चोर कुणाला म्हणायचे आहे आणि राखण करणारी कुत्री कोण आहे?
जीभ चोर आहे कि पाहरेकरी? बुद्धी काय आहे ? आणि आंबट,गोड आणि चटपटीत हे कुठले रस आहेत?
पण कबीर तर एक अशिक्षित ,निरक्षर जुलाहा होता. त्याने कशी एवढी वैचारिक आणि आध्यात्मिक उंची गाठली असेल? केवढी विलक्षण असेल त्याची बुद्धिमत्ता!
कसा असेल त्याच्या आयुष्याचा प्रवास?
कसा असेल तो काळ, ज्यात तो १२० वर्षाचे आयुष्य जगला?
काशीला मेला माणुस की तो सरळ स्वर्गात जातो.
मगहर नावाचे एक लहानसे गाव आहे, त्या गावानेच काय पाप केले आहेत माहीत नाही, पण तिथे जर मृत्यु आला, तर पुढचा जन्म गाढवाचा मिळतो, अस मानतात।
पण त्या काळात ,जेव्हां धर्माचा पगडा इतका जबरदस्त होता, तेव्हां काय या माणसाचा आत्मविश्वास!
१२० वर्षाचा म्हातारा म्हणतो
क्या काशी क्या ऊसर मगहर, राम बसे मन मोरा।
जो काशी मर मिले बसेसर, रामहिं कौन निहोरा।।
राम माझ्या ह्रदयात आहे, मग माझ्या साठी काय काशी, आणि काय ओसाड मगहर? जर काशीत मरूनच स्वर्ग मिळणार असेल तर रामनामाची शक्तिच काय? कशाला रामनाम घ्यायचे? आयुष्यभर कसेही वागावे, आणि मग काशीत जाऊन मरावे का?
म्हणतात की त्या १२० वर्षांच्या म्हातारेबुवांनी हट्टाने मगहरला जाऊन देह सोडला.
चौदाव्या शतकात असे वागणे सोपे नाही.
देवावर त्यांचा जेवढा विश्वास असेल तेवढाच विश्वास स्वत:वर आणि स्वत:च्या भक्तिवर पण असेल.
कबीर बद्दल खूपच उत्सुक्ता वाटू लागली.
मी काही साहित्याची अभ्यासक नाही. आध्यात्माच्या शोधात आत्ता तरी नक्कीच नाही. ज्या काळात मी जगते त्याच्या पाच सहाशे वर्ष आधी त्यांच अस्तित्व होतं. पण तरीही ते माझ्या जीवनाचा भाग आहे। येता जाता कुठे ही मला त्यांची आठवण होते. त्यांच काव्य आठवत आणि त्याच्या सहजते मुळे आपलसं वाटतं.
म्हणतात की महान रचनेचे हे अदभुत वैशिष्ट्य असतं, की ती आपल्या रचनाकारपासून वेगळी हून स्वत:च अस्तित्व स्थापित करू शकते. मग तिच्या अस्तित्वावरूनच कविचं अस्तित्व ओळखलं जातं . कारण कवि,त्याचं आयुष्य,तो काळ हे सगळ कालौघातात पुसलं गेलेलं असतं.
कबीर महान प्रतिभाशाली कवि आहे, थोर विचारवंत आहे, द्रष्टा आहे, पण त्या पेक्षाही जास्तं तो आपल्यासारखाच घरगुती सामान्य माणुस आहे, जो कापड विणून चार पैसे मिळवितो आणि प्रपंच चालवितो . माझ्यासाठी त्याचं सामान्य माणुस असणं हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
सामान्य माणसासारखीच त्याला ही मुलं होती, आणि आपल्या मुलांसारखी ती ही त्रास द्यायची. कबीरला कमाली नावाची मुलगी होती जी त्याच्याएवढीच प्रतिभावान होती.
कमाल नावाचा एक मुलगा होता,ज्याला बापाने सांगितलेल, केलेल काहीच पटायचे नाही.
खरं की खोटं माहीत नाही पण म्हणतात, जेव्हां कबीर म्हणाले
काल करे सो आज कर,आज करे सो अब
पल में परलय होएगी, बहुरी करेगा कब।।
तेव्हां हा त्याचा स्वत:चा मुलगा म्हणाला
आज करे सो काल कर काल करे सों परसो
इतनी जल्दी क्या है प्यारे अभी तो जीना बरसों।
चिराग तले अंधेरा. या कमालबद्दलच निराश होऊन कबीर म्हणाले होते हा असा पुत्र जन्माला आल्यामुळे कबीरचे वंशच बुडाले.
बूड़ा बंस कबीर का, उपजा पूत कमाल.
हरि का सिमरन छोडि के, घर ले आया माल।
सामान्य माणसाप्रमाणेच तो प्रसंगी एकटा पडतो, दुखी होतो, व्यथित होऊन म्हणतो
ऐसा कोई ना मिलै, जासो कहूँ निसंक।
जासो हिरदय की कहूँ, सो फिर मारे डंक।।
असं कोणी भेटतच नाही की ज्याचासमोर काहीही न लपविता नि:शंकपणे मन मोकळं करता येईल. ज्या कुणावर विश्वास ठेवतो तोच विश्वासघात करतो.
सुखिया ढूँढत मैं फिरूँ,सुखिया मिलै ना कोय।
जाके आगे दुख कहूँ, पहलै अठै रोय।।
मला वाटायचे की मीच दुखी आहे. पण शोधूनसुद्धा एकही सुखी माणुस सापडत नाही. ज्या कुणाला मी माझ दु:ख सांगायचा विचार करतो तो माझ्या आधीच त्याच ग-हाणं मांडायला बसतो.
ऐसा कोई ना मिला, जासो रहिये लागि।
सब जग जलता देखिया, अपनी अपनी आगि।।
अस कोणी भेटतच नाही ज्याचा आधार मानावा. जगातला प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या आगीत जळतो आहे.
हिरदा भीतर जो जले , धुआँ ना परगट होय।
सो जाने जो जरमुआ, जाकी लागी होय।।
ह्रदयात जी आग लागते, त्याचा धूर बाहेर कुणाला दिसत नाही. ज्याचं जळतं फक्तं त्यालाच कळतं.
पण तो निराश होत नाही, हात पाय गाळत नाही . जे सत्य आहे ते मान्य करतो आणि मग पुढची वाट शोधतो।
चहै आकास,पाताल जा, फोडि जाहु ब्रह्नांड।
कहै कबीर मिटी है नाहीं, देह धरे का दण्ड।।
आकाशात जा ,पताळात जा नाहीतर ब्रह्मांड फोडून पलिकडे जा. पण देहाचे भोग काही सुटणार नाही.
त्यातून पळवाट नाहीच. हे सत्य त्याला नीट कळलं आहे. मग ते सुसह्य कस होईल हा विचार तो करतो.
बायको ,पोरं घरदार असलेला आपल्यासारखाच माणूस तो.
जसे प्रश्न आपल्याला पडतात तसे त्याला ही पडले असतील का?
कबीरसाहित्य वाचताना लक्षात येतं, की जसं आपण विचारतो पहिले अंड की पहिले कोंबडी, तसच कबीरच्या मनात पण येतंच की.
पण हेच प्रश्न जेव्हां तो विचारतो तेव्हां थोर साहित्याचे निर्माण होते.
प्रथमें गगन कि पुहुमें प्रथमें । प्रथम गगन की पृथ्वी पहिली
प्रथमें पवन कि पाणिं।। प्रथम पाणी की पवन
प्रथमें चंद कि सूर प्रथमें प्रभु। प्रथम चंद्र की सूर्य प्रथम प्रभु,
प्रथमें कौन बिनाणि।। आधि कशाचे सृजन.
प्रथमें प्राण कि प्यंड प्रथमें प्रभु। प्रथम प्राण कि देह प्रथम प्रभु,
प्रथमें रकत की रेतं ।। प्रथम रक्त की रेतं.
प्रथमें पुरुष कि नारी प्रथमें प्रभु। प्रथम पुरुष की नारी प्रथम प्रभु,
प्रथमें बीज कि खेतं।। प्रथम बीज की शेतं
प्रथमें दिवस कि रैणि प्रथमें प्रभु। प्रथम दिवस की रात्र प्रथम प्रभु
प्रथमें पाप कि पुण्य।। प्रथम पाप की पुण्य.
कहे कबीर जहाँ बसहु निरंजन। म्हणे कबीर जिथे वसे निरंजन
तहां कछु आहे कि सुन्यं। तिथे काही आहे की शुन्य
काही वर्षांपूर्वी कवि ग्रेसचा एक कार्यक्रम ऐकला होता. त्यात ते मीरेच्या एका पदाबद्दल बोलताना म्हणाले होते की मीरा सत्याचा आभास निर्माण करते। हे वाक्य उगीच डोक्यात अडकूनच पडलं होतं.
पण वरच्या पदाच्या शेवटच्या दोन ओळी वाचताना त्या वाक्यची पुन्हा आठवण झाली.
कबीरला काय उत्तर सापडलं असेल या प्रश्नांचं?
उत्तर परत त्यांच्याच पदात सापडतं
जल में कुंभ ,कुंभ में जल है। जलात घट, घटात ही जल
बाहर भीतर पानी आत अन बाहेर पाणी
फूट कुंभ जल जलहि समाना फुटुनि घट जल मिळे जलासी
यह तथ कहो गियानी हे सत्य जाणतो ज्ञानी
आदे गगना अंते गगना आदि गगन अंतही गगन
मध्ये गगना भाई गगनच फक्त मधे रे
कहै कबीर करम किस लागै म्हणे कबीर कर्म अविकारी
झूठी संक उपाई।। खेळ मनाचा समझ रे.
या पदाबद्दल एका पुस्तकात वाचले. लेखकाने याच अर्थाचे श्लोक वेदांमध्ये आहेत असे उदाहरणासकट सांगितले होते. पण कबीरचे जे काही चरित्र उपलब्ध आहे त्यानुसार तर वाटत नाही की त्याला वेद-पुराण वाचण्याची संधी कधी मिळाली असेल.
कबीरवर मिळाली, ती सगळी पुस्तकं गोळा केली. पुस्तकांचा ढीगच घेऊन बसले. वाचायला सुरुवात केल्यावर अक्षरश: डोक्याला मुंग्या आल्या. तो कबीर ज्याला मी लहानपणा पासून ओळखते, आणि ज्याच्या काव्याची सहजता आणि सरलता हेच मला भावतं, त्या कबीरची इतकी क्लिष्ट व्याख्या?
कबीरच्या काव्याचे तीन प्रकार आहेत- साखी, सबद आणि रमैनी . हे तर माहीत होतं। शाळेतल्या पुस्तकात होतंच.
पण प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांगायला असंख्य संस्कृत श्लोकांचे, कुरानचे वगरे उदाहरण.
माझ्या लक्षात आलं की आपल्याला ही भाषाच कळत नाहीए.
एक जुनी गोष्ट आठविली. माझी मुलं लहान असताना तबला शिकायला जायची. काही महीने झाले तरी त्यांना काही विशेष वाजवता येत नव्हतं. मी त्यांच्या शिक्षकाला या बद्दल विचारल्यावर ते म्हणाले
“मी त्यांची बेसिक तयारी करून घेतो आहे. तबल्यावर वाजणारा प्रत्येक अक्षर त्यांच्या बोटात आणि डोक्यात बसला आहे. अजून ते इतके लहान आहेत की त्याचा काय आणि कसा वापर करायचा त्यांना कळत नाही. पण जेव्हां कळेल तेव्हां त्यांचाजवळ सर्व मटेरियल तयार असेल. त्यांना आतूनच कळेल कसं वाजवायचं ते” मलाही तसच वाटु लागलं.
या पुस्तकातल्या महान लेखकांचे नावपण माझ्या लक्षात राहत नाही. त्यांच्या कितीतरी आधीपासून मी कबीरला ओळखते. मुलांच्या तबल्याच्या बोलांसारखीच त्याची साखी माझ्या डोक्यात आधीपासून आहे.
पूर्वी फ्रेंच शिकायचे तेव्हां शिकवणा-या फ्रेंच शिक्षकाने सांगितलं होतं, की हिंदी किंवा इंग्लिशमधे फ्रेंच शिकण्यापेक्षा फ्रेंचमधेच फ्रेंच शिका.
तसच मी या बाबतीत करायचे ठरविले आहे. कबीरमधेच कबीर शोधायचा. त्याचीच ट्युशन लावायची.
ज्या साखी आणि पद आपल्याला येतात आधि तेच परत explore करायचे. थोडा उशीर लागेल, पण कळेल हळू हळू. आपल्याला तरी कुठे घाई आहे.
हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या ?
रहें आजाद या जग से, हमन दुनिया से यारी क्या ?
जो बिछुड़े हैं पियारे से, भटकते दर-बदर फिरते
हमारा यार है हम में, हमन को इंतजारी क्या ?
न पल बिछुड़े पिया हमसे, न हम बिछड़े पियारे से,
उन्हीं से नेह लागी है, हमन को बेकरारी क्या ?
आणि मग अस वाटलं की जणू काही कबीरच आव्हान देत म्हणत आहेत
जिन खोजां तिन पाईयां, गहरे पानी पैठ।
जो बावरा डूबन डरा, रहा किनारे बैठ।।
स्वाती
Jikde tikde kabeer excellent
I have become curious about Kabeer
LikeLike