शहनशाह
मी हिन्दी मीडियमच्या सरकारी शाळते शिकले. माझ्या वर्गात समाजातल्या सर्वसामान्य वर्गातली मुलं होती. पण त्यात एकही मुलाचे नाव कबीर नव्हते. राम, श्याम, मोहम्मद, देव, भगवान, इब्राहीम … पण कधीही एकही कबीर नाही.
मोठं झाल्यावर मात्र काही कबीर सापडले. पण ते सर्वच सामाजातल्या उच्च वर्गातले, उच्च शिक्षित, कलाकार, लेखक असे काहीसे वलयांकित होते.
आज विचार करून या गोष्टीचं मला फार आश्चर्य वाटत.
हा कबीर नावाचा फक्कड माणूस असा पंचतारांकित कसा काय झाला ?
दोन वेळचे जेवण कुटंबाला मिळावे एवढीच इच्छा असलेला हा फकीर. फक्कड, मस्तमौला. शेवटी माणूसच. पण मुक्तीची इच्छा असलेला. जेव्हां मोहमायेत अडकायला होतं तेव्हां तो कंटाळून या मायेलाच प्रश्न विचारतो.
सरग लोक में क्या दुख पड़िया, तुम आई कलि माँहि
जाति जुलाहा, नाम कबीरा, अजहुँ पतीजो नाँही
तहाँ जाहु जहाँ पाट पटम्बर,अगर चंदन घसि लेना,
जाई हमारे कहा करौगी, हम तो जात कमीना।
तिथे स्वर्गलोकात अशी कुठली विपत्ति आली की तुला, इथे मृत्युलोकात यावे लागले. मी तर जुलाहा जातीचा , कबीर नाव आहे माझं. अजुन तुला मझ्या हीनतेवर विश्वास कसा होत नाही. तू तिथे जा जिथे लोक रेशमी वस्त्र घालतात, धूप जाळतात आणि चंदनाचा लेप लावतात. माया ,तू माझ्याकडे येऊन करशील तरी काय? मी गरीब, त्यातही अगदी खालचा जातीचा आहे.
कबीरवाणी वाचल्यावर लक्षात येतं की असं ही नाही की कबीरला मोठा झाल्यावर कधीतरी साक्षात्कार झाला. तो तसाच आहे. फक्त वाढत्या वयाबरोबर अजून परिपक्व होत जातो . तो जे बोलतो ते अनुभवाच्या आधारे. त्याचे बोल सच्चे आहेत, म्हणूनच तर मनाचा वेध घेतात. म्हणूनच तर त्याचे व्यंग इतके धारदार आहेत.
मैं कहता आँखन देखी, तू कहता कागद की लेखी ।।
तर हा कबीरा या कागद की लेखीवाल्या पंडितांमधे कसा अडकला ?
इंदौरला रस्त्यावर एकतारा वाजवत कबीरची भजन गाणारे भिकारी पण मी बघितले आहेत खरे, पण त्यातही कुणाच नाव कबीर असेल अस का कोण जाणे, पण कधी वाटलं नाही.
घराजवळ अगदी खेडेगावातली अशिक्षित आजी रहायची . मुलं शिकलेली ,नोकरी करणारी होती. आजीबाईंना अशिक्षित असल्या तरी खूप म्हणी आणि दोहे तोंडपाठ होते. कबीर त्यांना चांगलाच माहीत होता.
पुस्तक वाचायची फार इच्छा होती, म्हणून माझ्याकडून लिहायला वाचायला शिकायच्या. त्यांना नातू झाला. त्याचं नाव काय ठेवायचं असा विचार चालू होता. मी सल्ला दिला की कबीर ठेवा, तर आजीनीं दोन्हीं कान धरून जीभ बाहेर काढली. म्हणाल्या “ नहीं, देवेंद्र प्रताप सिंग रखेंगे ।”
मी म्हंटलं “ लेकिन कबीर उससे छोटा और अच्छा नाम है ।”
त्या म्हणाल्या “ है तो, लेकिन आगे का क्या पता ? जो उस लायक ना निकला तो? नाम खराब कर देगा।”
“और देवेंद्र प्रताप सिंग ?” त्यांनी फक्त खांदे उडविले.
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं . उत्तरापलीकडचं पण मला खूप काही कळालं.(अस मला वाटलं) काय ते मला शब्दात सांगता येणार नाहीं.
मग काही वर्ष मी आपल्याला खूप काही भारी समजलय या आंनदात होते. आणि एक दिवस मी इश्क मस्ताना पद वाचलं. त्यात या दोन ओळींचा काही केल्या काही अर्थच कळेना.
खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है,
हमन गुरनाम साँचा है, हमन दुनिया से यारी क्या ?
नेहमी प्रमाणे मला लक्षात आलच होतं की ह्याचा फक्त शाब्दिक अर्थ कळून उपयोग नाही.
आम्ही बरीच वर्षं हॉस्पिटलचा आवारातच रहायचो. ओळखीची माणसं आजारी पडली की दवाखान्यात यायची आणि तिथ पर्यंत आलीच असायची म्हणून आम्हालाही भेटायला यायची. असेच एकदा एक गृहस्थ आले. प्रसिद्ध नामांकित मराठी नट होते .त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. प्लास्टर लावून भेटायला घरी आले. म्हणाले
“ साध्या सुध्या माणसाचा हात फ्रॅक्चर झाला तर डॉक्टर दोन आठवडे प्लास्टर ठेवायला सांगतो, पण मला तीन आठवडे सांगितलं आहे कारण काय, तर त्याला ही टेन्शन आलय. शेवटी हात कुणाचा ? कुणा अश्या तश्याचा नाही तर —–चा. माझ्या नावानेच दडपण येतं माणसाला. पण शेवटी त्याला ही हा मान मिळतोच ना. कुणाचा हात दुरुस्त केला तर —-चा.”
त्यांची पत्नी शेजारी बसून “अगदी बरोबर” म्हणून मान डोलवत होती. मला एकदम शराबी फिल्म मधला एक डायलॉग आठविला “मूँछें हों तो नत्थूलाल की तरह वरना ना हों.” फ्रॅक्चर असावे तर —-च्या हाताला , नाहीतर असूच नये.
हे सगळ अतिशय विनोदी ही वाटत होतं आणि त्यांची कीव ही वाटत होती.
रजनीकांतच्या विनोदांसारखे ते आमच्या हसण्याचा विषय झाले. त्यांना ताप आला तर दोन थर्मामीटर लागतात, एका थर्मामीटरनी मोजताच येत नाही कारण ताप कुणाचा, कुणा अश्या तश्याचा नाही तर —
मान बड़ाई ना करें, बड़ा ना बोलै बोल।
हीरा मुख से ना कहै, लाख हमारा मोल।।
अशाच लोकांसाठी कबीरदास म्हणतात की स्वत:च कौतुक आणि प्रशंसा करू नका. हि-याला कधी स्वत:चा तोंडाने सांगवे लागत नाही की मी लाख मोलाचा आहे. जर तो खरा असेल तर त्याची चमक लपूच शकत नाही.
मजा म्हणजे आपले नाव कशामुळे रोशन राहील याची प्रत्येकाची वेगळीच कल्पना आहे. त्याचासाठी लोकं दिवस रात्र कष्ट करतात . पण तेवढ्याने ही त्यांना विश्वास वाटत नाही की लोकांच्या लक्षात आलं आहे . मग आपण काय काय केलं हे ते स्वत:च इतरांना सांगत सुटतात. मुलं चांगली निघाली की अगदी त्यागमूर्ती वगैरे म्हणवल्या जाणा-या आया सुद्धा मी किती कष्ट काढले, मी कसं मूल घड़वलं चा पाढा वाचतच रहातात.
खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है।
जगात सगळेच स्वत:चा नावासाठी किती आटापीटा करत आहेत. ही सगळी वसवस आणि तडफड बघून कबीराच मन दुखी होतं.
हाड़ जलै ज्यूँ लाकड़ी,केस जले ज्यूँ घाँस।
सब तन जलता देख कर भया कबीर उदास।।
हे शरीर तर इतके नश्वर आहे की लाकुड आणि गवतासारखे जळून संपून जातं. त्याचा साठी माणूस काहीच करू शकत नाही. पण त्याचं नाव मागे राहील असं त्याला वाटतं. आणि त्याच्यासाठीच हा सगळा अट्टाहास असतो. पण कबीराचे देवा समोर आत्मसमर्पण इतकं पराकोटीचे आहे की तो स्वत:च अहंकार पूर्ण पणे सोडून देतो.
कबीर कूता राम का, मुतिया मेरा नाऊँ। कबीर कुत्रा रामाचा, मोत्या माझे नाव
गलै राम की जेवड़ी, जित खेंचे तित जाऊँ।। गळ्यात साखळी रामाची,ओढील तेथे जावं
या अशा कबीराला स्वत:च्या नावाबद्दल आसक्ति असेल? सामान्य माणसाने आपल्या मुलांचे नाव कबीर ठेवावे हा माझाच विचारसुद्धा मला अतिशय हास्यास्पद वाटू लागला.
खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है,
हमन गुरनाम साँचा है, हमन दुनिया से यारी क्या ?
ज्या माणसाला फक्त एक देवाच नावच शाश्वत आहे असा विश्वास आहे, त्याला काय फरक पडतो जग त्याला काय म्हणतं ह्याने? त्याला काय काळजी, कोणी त्याचं नाव लक्षात ठेवेल की नाही ह्याची.
तो तर म्हणतो
चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह।
जा को कछु ना चाहिए, वो ही शहनशाह।।
Bahot khoob.
LikeLike