कबीराच्या साखीमधे सारखच त्यांच नाव येतं. बहुतेक कवि कवितेच्या शेवटच्या कडव्यात स्वत:च नाव घालतात. चित्रकाराने चित्र पूर्ण झाल्यावर चित्रावर सही करावी तसेच.
पण किती तरी वेळा कबीर शेवटी सही करत नाही, तर स्वत:ला उद्देशून बोलल्यासारखेच बोलतात.
कबीरा गरब न कीजिये, कबहूं न हंसिये कोय।
अबहूं नाव समुंद्र में, का जाने का होय॥
कबीरा , गर्व करू नको, आणि इतरांवर हसू ही नको। आज तुझी नाव समुद्रात व्यवस्थित तरंगते आहे , पण भविष्य तुला माहीत नाही. पुढच्याच क्षणाला एक मोठी लाट येऊन तुला बुडवू पण शकते.
चलती चाकी देख के दिया कबीरा रोय।
दुइ पट भीतर आइ कै, साबित गया न कोय॥
जात चालताना बघून कबीराच्या डोळ्यात पाणी आलं. एकदा दोन पाटांमधे अडकलं की मग कोणाची सुटका नाही.
कबीरा लोहा एक है, गढ़ने में है फेर।
ताही का बख्तर बना, ताही की शमशीर॥
कबीरा, लोखंड तेच आहे , पण त्याचा वापर कसा आणि कशासाठी होतो, त्याने त्याच लोखंडाचे गुण बदलतात. ज्या लोखंडाची तलवार बनते त्याच लोखंडाने बख्तर म्हणजे कवच सुद्धा बनतं. एक जीव घेतं तर दुसरं जीव वाचवतं.
कबीरने कधीच काही लिहिले नाही. ते जे काही बोलायचे ते लोकांनी लक्षात ठेविले. जर ते उपदेश करत असतील तर त्यात सारखं स्वत:च नाव कशाला घेतील ?
आधि मला वाटायचे की हे लाउड थिंकिंग आहे. मग लक्षात आलं की तसं नसून हा स्वत:शीच संवाद आहे.
पण त्यात ही कबीर मैं किंवा मेरा का म्हणत नाही ?
या प्रश्नाचं उत्तर मला अचानकच मिळालं. माझा मुलगा जेव्हां लहान होता तेव्हां त्याला कुठलाही प्रश्न विचारला की त्याचं उत्तर तो फार मजेशीर द्यायचा.
त्याला विचारलं की “नील, तुला भूक लागली आहे का ?” तर तो म्हणायचा “ हो, नीलला भूक लागली आहे.”
“नील, तू कुठे गेला होतास?”
“नील फिरायला गेला होता”
आम्ही त्याला खूप शिकवायचो की सारखं नील म्हणायचं नाही. असं वाटतं की तू दुस-याच माणसाबद्दल बोलतो आहे. मी, माझं, मला म्हणायचं.
काही दिवसांपूर्वी भाचीचा तीन वर्षांचा मुलाला पण असंच बोलताना पाहिलं,आणि माझ्या मनात विचार आला की देव जेव्हां माणुस निर्माण करतो तेव्हां त्याचा मनात अहंकार मी , माझं , मला वगरे भावना नसतात. आपणच प्रयत्नपूर्वक लहानपणीच हे त्याचा डोक्यात भरवितो . आणि मग आपणच नंतर त्याला नाव ठेवतो त्याच्या ईगोबद्दल.
असंच लहानपणी मुलं सतत खेळत असायची, कितीही झोप आली तरी काहीतरी करून टाळायचा प्रयत्न करायची. तेव्हां वाटायचं की देवाने खरं तर आळस निर्माणच केला नव्हता. माणूस जसा जसा मोठा होतो हा गूण तो स्वत:च मिळवतो.
कबीर स्वत:कडे मी म्हणून बघतच नाही. एका तिराहिताकडे बघावं, त्याच्याबद्दल बोलावं असे ते स्वत:बद्दल बोलतात.
हरि का नाम लिखि लियो सरीर॥ लिहिले हरिचे नाव शरीरा॥
मुसि मुसि रोवै कबीर की माई। मुसमुसुन रडे कबीरची माता।
ऐ लरका कैसे जीवहि खुदाई॥ कसे हे पोर जगेल विधाता ॥
कहत कबीर सुनहु मेरी माई। म्हणे कबीर ऐक माझी माई।
हमरा दाता एक रघुराई॥ माझा दाता तो रघुराई॥
कबीरने कापड विणणे सोडुन दिले आणि हरिभक्तित असा बुडला की स्वत:ला पण विसरून गेला. आता कबीरची आई रडत बसली आहे की हे खुदा, या मुलाचे कसे काय होणार ? कसा हा जगणार पोटा पाण्याची सोय केल्या विना? कबीर म्हणतो “ माई तू काहीही काळजी करू नको. तो त्याचा देव त्याची काळजी घेईल. यात ही मी म्हणतो नाही, कबीर म्हणतो की देव माझी काळजी घेईल.
असे नाही की कबीरने मी माझा वगैरे शब्द अजिबातच वापरले नाही, पण तो जरा घाबरतो या शब्दांना.
मैं मैं बड़ी बलाई है, सकै तो निकसो भाजि।
कब लग राखौं है सखि ,रुई पलेटी आगी॥
मी मी ही एक फार मोठी व्याधी आहे, शक्य झाल्यास स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडवुन वेळीस पळ . कारण हे सखी कापसात अग्निला गुंडाळून कसे आणि कितीवेळ ठेवणार? या साखीत आणि अजूनही ब-याच साखींमधे सखी ते स्वत:च्या बुद्धीला उद्देशून म्हणतात अस मला वाटतं.
मैं मैं मेरी जिनि करैं, मेरी मूल बिनास। मी मी माझं जग म्हणे, माझं मूळ विनाश।
मेरी पग का पैषणा , मेरी गल की फांस॥ माझं पायात बेड्या , माझं गळ्यात फास॥
मराठीतली एक फार अप्रतिम म्हण आहे. ’मीच एक मोर बाकी सगळे लांडोर.’ माझा मामा खूप वापरायचा ही म्हण. आम्ही ह्याला मोर सिंड्रोम म्हणायचो. जसं जसं वय वाढतं आपल्या चारीकडे इतके मोर नाचताना दिसू लागतात की नो मोर म्हणावस वाटू लागतं . हळू हळू बहुतेक सगळे स्वघोषित मोरच उरतात.
त्याचं एक अप्रतिम पद आहे.
अवधू माया तजी ना जाई अवधू माया सुटता सुटे ना
गिरह तज के बस्तर बांधा, घर सोडुनि स्वीकारला भगवा
बस्तर तज के फेरी भगवा सोड लंगोटी
लड़िका तजिके चेला किन्हा, पुत्र त्यागुनी शिष्य जमिविले
तहुँ मति माया घेरी। तिथं ही माया ना सोडी
काम तजे तें क्रोध ना जाई, काम त्यागिले,क्रोध ना जाई
क्रोध तजे तें लोभा क्रोध सोडू तर लोभं
लोभ तजे अहंकार ना जाई, सुटले लोभ अहंकार न जाई
मान बढाई सोभा मान-प्रशंसा-क्षोभं
जैसे बेल बाग में अरुझी, वेल जशी झाडात गुंतली
मांहि रही अरुझाई तशी गुंतली माया
छोरे से यह छूटत नाहीं, सोडविले बहु, सुटेना गुंता
कोटिन करै उपाई। कोटि प्रयत्न गेले वाया
मन बैरागी माया त्यागी, मन वैरागी, त्यजिली माया
शब्द में सुरत समाई शब्दात जीव गुंतला
कहे कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर, सुनो भाई साधो
यह गम बिरले पाई मुक्ति पावतो विरळा
हे पद खूप वेळा वाचल्यावर लक्षात आलं की मोहमाया सोडायची पहिली नसून शेवटची पायरी स्वत:पासून मुक्ति आहे. वय वाढलं ,शरीर थकलं की हळू हळू खाणे,पिणे, कपडे, पैसा, नातीगोती या सर्व ऐहिक गोष्टींची आवड नैसर्गिक रीत्याच कमी होत जाते. मग फक्त ’मी’ च तेवढा उरतो. त्यामुळेच बहुतेक म्हातारी माणसं फक्त स्वत:बद्दल विचार करतात, स्वत:बद्दलच बोलतात.
माया तजे तो क्या हुआ, मान तजा ना जाय। मान बड़े मुनिवर गये, मान सबन को खाय॥
पूर्वी मला अस वटायचं की लहान मुलांच मन फार मोठं असतं, कुठली ही गोष्ट पटकन विसरून जातात. कितीही मोठं भांडण झालं तरी दुसर-याच क्षणाला सर्व विसरून परत खेळू लागतात. माणूस वयाने जेवढा लहान असतो, मनाने तेवढाच मोठा असतो. वय वाढतं तसं मन छोटं आणि क्षुद्र होत जातं.
पण आता वाटत की बहुतेक सुरुवातीला त्यांचा स्वाभिमान इतका भक्कम असतो की त्याला कशानेच धक्का लागत नाही. अपमान होत नाही. जसं जसं वय वाढतं तसं तसं स्वाभिमान अहंकारात कधी बदलतो कळत नाही. आणि अहंकार हा अतिशय नाजुक आणि ठिसूळ असतो. त्याला सारखेच, येता जाता तडे जातच असतात.
एकदा एक मैत्रिण म्हणाली होती की मुलगी गणितात नापास झाली ह्याचं एवढ दुख होत नाही, पण माझी मुलगी गणितात नापास झाली हे असह्यच आहे.
एक फारच विनोदी गोष्ट आठविली. आम्ही नवीन घरात रहायला गेलो. आमच्याकडे एक शेरी नावाची लॅब्रेडॉर कुत्री होती. सामान हलविताना ती आम्हाला बघायची. आमच्या बरोबर नवीन घरी पण यायची. संध्याकाळी आम्ही परत जायचो. पण नंतर आम्ही जेव्हां खरच नवीन घरात रहायला गेलो, तेव्हां शेरी फार अस्वस्थ झाली . संध्याकाळी आपल्या घरी चला म्हणून कूंss कूंss करू लागली. मग शेवटी पर्याय नाही म्हणून शांत बसली. पण जुन्या घरात दाराच्या जवळ जरी कोणी आलं तर भुंकुन भुंकुन हैराण करणारी शेरी नवीन घरात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस, कोणीही आलं तरी भुंकायचीच नाही. आपला काहीही संबंधच नाही असे तिच्या चेह-यावर भाव असायचे. आरामात कूस बदलून झोपून टाकायची. मुलं म्हणायची शेरीला वाटत की दुस-याचा घरात चोर का येईना, मी कशाला राखण करू? काही दिवसांनी, जेव्हां तिला पटलं की हे आपलंच घर आहे ती परत अत्यंत जागरूकपणे खुट्ट जरी झालं तरी भुंकायला लागली. जो पर्यंत तिला घर स्वत:च आहे असं वाटत नव्हतं तो पर्यंत ती खूपच मजेत होती.
मी एक प्रयोग म्हणून स्वत:बद्दल अशा पद्दतीने फक्त विचारच करून बघितला. मजा म्हणजे जेव्हां मी मनातल्या मनातसुद्धा स्वातीच असं, आणि स्वातीच तसं म्हणते तेव्हां मला माझच नाव फार अनोळखी वाटतं. माझा लॅपटॉप म्हणताना जी आपुलकी किंवा मालकी वाटते ती स्वातीचा म्हंटल्यावर वाटत नाही.
मेरा मुझ में कुछ नहीं जो कछु है सो तेरा ।
तेरा तुझको सौंपता , क्या लागे है मेरा।।
पण हे अति अवघड आहे. जमणे ही फार लांबची गोष्ट झाली, आधि पटणेच फार कठिण आहे.
Khoop chhan. Kharach kathin aahe ase samjun vagane.
LikeLike